ती परी अस्मानीची

 ती परी अस्मानीची


माझा उमेदवारी चा काळ, मी CA होऊन नुकताच एका मध्यम आकाराच्या अकाउंट फर्म मध्ये job ला लागलो. ऑफिस नरिमन पॉईंट ला. मी चर्नीरोड ला रहात असल्याने मला सोयीचे होते. तेव्हा कॉम्पुटर नवीन नवीन होते. खरं तर रविवारी दिवस पूर्ण मजेत घालवल्यावर सोमवारी कामावर जायचा समस्त नोकरदारांप्रमाणे मलाही कंटाळा येणं तसं स्वाभाविक होतं पण मला कधीच तसं वाटलं नाही. मी सोमवारी लवकर उठून पटापट आवरून, छान कपडे घालून लवकरात लवकर ऑफिस ला पोचायचा प्रयत्न करायचो. या सर्व धावपळी चे कारण पण तेव्हढेच खास होते.. किमया.. आमची बॉस..

दर सोमवारी किमया खूप लवकर ऑफिस ला यायची आणि सर्व स्टाफ मेंबर बरोबर खूप प्रेमाने बोलायची.. ऑफिस कामाबद्दल आणि वैयक्तिक खाजगी, घरगुती गप्पा पण.. लवकर गेलो कि तिचा सहवास जास्त मिळायचा.. म्हणून लवकर जायचा आटा पिटा..
तर ही किमया.. नावाप्रमाणेच अतिशय सुंदर, राहणीमान उच्च व आकर्षक.. कपड्यांचा चॉईस व रंगसंगती एकदम रिच.. जे परिधान करेल ते तिच्या साठीच स्पेशल बनवून घेतले आहे असे वाटावे.. लाईट लिपस्टिक, कानातले व हातातले कपड्यांना मॅचिंग...तिचे खळखळून हसणे..एकदम हिरोईन मटेरिअल.. खरं तर ती या आकड्यांच्या नीरस जगात का आली असेल असा प्रश्न पडावा एव्हढी छान.. दिसायला देखणी असून पण कामात पण प्रचंड हुशार.. देव बुद्धी आणि सौंदर्य एकत्र खूप कमी जणांना बहाल करतो त्यातली ही एक किंवा एकमेव.
तर या सोमवारच्या सकाळच्या गप्पांमुळे मी हळूहळू तिच्या प्रेमात पडलो.. मला याची कल्पना होती कि तिच्या संपर्कात येणारा कोणीही अत्यंत कमी अवधीत तिच्या प्रेमात पडत असणार.. बोलताना कळले कि ती देखील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. खूप कष्ट व अभ्यास करून ती CA होऊन या फर्म मध्ये चार वर्षांपासून काम करतेय.. आमची वये सारखीच होती पण तिने दोन्ही ग्रुप पटकन क्लीअर केल्याने ती माझ्या आधी CA झाली. आणि या पटेल आणि सोहनी या फर्म मध्ये Executive म्हणून जॉईन झाली व चार वर्षात vice प्रेसिडेंट झाली. आज जवळ जवळ 200 जणांचा स्टाफ व अनेक कंपन्यांचे अकाउंट ती हुशारीच्या जोरावर लिलया सांभाळत होती.
मला पण एक गोष्ट जाणवू लागली होती कि ती पण हळू हळू माझ्या स्वभावाच्या प्रेमात पडू लागली होती.. कधी कधी चहा प्यायला तिच्या केबिन मध्ये बोलावून घ्यायची.. मी तसा दिसायला खूप ग्रेट नाही पण रुबाबदार आहे व तरुण पणात केलेल्या व्यायामामुळे माझे व्यक्तिमत्व उठून दिसते. पण किमया सारख्या मुलीने प्रेमात पडावे असे माझ्याकडे काहीच नव्हते. तिचा जन्मच राणी बनून राज्य करण्यासाठी झाला होता. आणि मी आत्ता कुठे बस सोडून मोटरसायकल ने ऑफिसला यायला लागलो होतो.
तिनेच आग्रह केल्यामुळे वाढदिवस किंवा तत्सम occasion ने तिच्यासोबत बऱ्याचदा लंच किंवा डिनर ला जायचा योग आला. माझे मन नेहमी अशा प्रसंगी उचल खायचे कि तिला विचारून टाकू लग्नाबद्दल.. पण माझे व्यावहारिक मन मात्र धजावत नव्हते.. एक तर तिचा नकार पचवणे अवघड होते आणि ती रागावली तर नोकरीं जायची भीती होती.. नोकरी मिळालीही असती दुसरी पण तिच्या सहवासाला पण मी मुकलो असतो.. ही भीती मोठी होती.
आणि अचानक मला माझ्या कलीग कडून कळले कि आमच्या फर्म च्या डायरेक्टर पैकी विक्रम सोहनी यांच्या सोबत तिचे लग्न ठरलेय. नंतर तिनेही मला ते केबिन मध्ये बोलावून सांगितले.. चहा पिताना माझा दीर्घ उसासा तिला ऐकू तर जाणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेत मी तिचे सुहास्य वदनाने अभिनंदन केले.
कालांतराने तिचे लग्न धूमधडाक्यात विक्रम सोबत होऊन ती किमया सोहनी झाली. लग्नानंतर तिचे ऑफिस ला येणे थोडे कमी झाले आणि माझापण सकाळी लवकर उठून ऑफिस गाठण्याचा उत्साह ओसरला.
पण एका सोमवारी नेहमीच्या वेळेला मी ऑफिस ला गेलो तर ती आधीच आली होती. तिने मला केबिन मध्ये बोलावले व नेहमीच्या उत्साहाने स्वागत केले.. मी फारसा बोलत नव्हतो पण ती मात्र तिच्या आयुष्यात लग्नानंतर घडलेला बदल आनंदाने व खुलवून सांगत होती.
मी केबिन मधून बाहेर पडताना ती अचानक भावुक झाली.. तिने माझे हात हातात घेतले आणि म्हणाली.. मी तू विचारशील म्हणून खूप वाट पाहिली.. तुला मला राणी म्हणून पहायचं होतं हे मला माहित होतं पण तू मला विचारलं असतंस तर मी होकार तर दिलाच असता आणि तुला 'राजा' बनवले असते..

©आशुतोष 

टिप्पण्या