आई
आई
कालचीच गोष्ट.. रेल्वे स्टेशनवर मी मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट पहात उभा होतो. एक हट्टा कट्टा तरुण एका वयस्कर स्त्री व अजून एका तरुण मुलासोबत माझ्या शेजारी येऊन थांबला. तरुणाजवळील सामान व त्याच्या पिळदार शरीरयष्टी वरून तो मिलिटरी जवान वाटत होता. ती बाई बहुतेक त्याची आई असावी. ती सतत त्याच्या केसातून व गालावरून हात फिरवत होती. आई दिसायला अती सामान्य, रंग सावळा उंची साडेचार फूट नऊवारी जुने लुगडं वय अंदाजे 50 पुढे मागे..
त्या तरुणाने सोबत असलेल्या मुलाला आपला मोबाईल दिला व आईसोबत फोटो काढायला सांगितले.. आईने मुलाच्या कंबरे भोवती हात टाकून, तसेच त्याला गोंजारताना दोन तीन फोटो काढले. हे करताना तिच्या चेहेऱ्यावर मुला बद्दलचे कौतुक ओसंडून वहात होते..तिने मोबाईल घेऊन फोटो कसे आले ते बघितलं.. महत्वाचे म्हणजे स्वतः चा फोटो न बघता तिने मुलाचा फोटो मोठा (zoom) करून पाहिला..
शप्पथ सांगतो मला त्या मुलाचा हेवा वाटला..
आई गरीब असो , दिसायला कशी ही असो आई ती आई असते.तिच्यासारखे निस्वार्थी प्रेम जगात कोणीच करू शकत नाही याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि डोळ्यात अश्रू तरळले.
©आशुतोष

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा