ती

 ती


ती साधारण साठीतली स्त्री. राहणीमान मध्यमवर्गीय. दादर सारख्या उच्चभ्रू वस्तीत स्वतःचे घर आणि घर घेताना घराएव्हढी मोट्ठी टेरेस आवर्जून व खूप शोधून घेतलेली. कारण तिची बागकाम, फुलं, पक्षी यांची प्रचंड आवड. तशी तिने पुढाकार घेऊन बिल्डिंग भोवती भरपूर फुलांची व इतर झाडे लक्ष देऊन लावली. पण तिच्या घरासमोरील टेरेस मधील तिने फुलवलेली बाग एकमेवद्वितीय. विविध नर्सरीत जाऊन तिने आणलेली रोपं आज विविधरंगी फुले लेवून खूप आनंदाने डोलत आहेत. आणि या फुलांवर व झाडांवर खेळायला विविध पक्षी नेहमी हजेरी लावत. त्या पक्षांसाठी एक कारंजे व खाण्याचे भांडे कायम भरून ठेवलेले असे. आणि या टेरेसवर एका कोपऱ्यात आराम खुर्चीत बसून हा पक्षांचा खेळ बघत रमून जायची ती. या पक्षांमध्ये पण तिची सर्वात आवडती होती एक चिमणी. ती चिमणी तर पूर्ण टेरेसभर बागडायचीच पण धीटपणे तिच्या जवळ येऊन पण बसायची.

मागील वर्षी ती चा नवरा अचानक वारल्या नंतर तिचा बागेत बसणे हाच छंद होता. तशी ती उच्च विद्याविभूशीत होती. दोन वर्षांपूर्वी मंत्रालयातून रिटायर झाली होती.
पण दोन महिन्यांपासून तिच्या बिल्डिंग च्या शेजारील प्लॉट वर बांधकाम सुरु झाले. कामामुळे प्रचंड धूळ व माती सर्वत्र उडायची त्यामुळे तिच्या बागेतील झाडे पण मरगळून गेली होती. मशीन चे व ट्रक्स चे आवाज दिवसरात्र यायचे त्यामुळे पक्षांचा किलबिलाट पण कमी झाला होता. पण तिची आवडती चिमणी मात्र रोज कुटुंबासहित हजेरी लावायची. वर्षभरात नऊ मजली इमारत बाजूला उभी राहिली व त्यावर एक टोलेजंग मोबाईल टॉवर उभारला गेला.
आणि काही महिन्यातच तिच्या टेरेस गार्डन मध्ये येणारे पक्षी कमीकमी होत गेले. तिची आवडती चिमणी पण येईनाशी झाली. ती च्या टेरेस गार्डन ची पार रया गेली. ती पण कोमेजून गेली.
हे असं कसं घडलं याचा शोध घेतल्यावर तिला कळलं की हा सारा त्या मोबाईल टॉवर चा प्रताप आहे. या टॉवर मधून निघणाऱ्या frequency waves मुळे पक्षांवर मधमांशांवर आणि माणसांवर प्रचंड वाईट परिणाम होतात हे तिला कळले.
तिने मंत्रालयात जाऊन या टॉवर परमिशन कोण देतं वगैरे माहिती मिळवली. मंत्रालयात काम केल्याचा व लोकांची कामं निस्वार्थी पणे करण्याचा तिला फायदा झाला. तिला सर्व माहिती व्यवस्थित मिळाली. मग तिने सोसायटी मधील लोकांना विश्वासात घेतले व याबाबत जनजागृती करण्यास सुरवात केली. तिच्या आजूबाजूच्या परिसरातील समविचारी लोक एकत्र येऊन एक चळवळच उभी राहिली. या चळवळीच्या माध्यमातून राज्य सरकार व भारत सरकारच्या concern डिपार्टमेंट सोबत भरपूर पत्रव्यवहार झाला व समोर च्या बिल्डिंग वरील टॉवर खाली उतरवण्यात त्यांना यश आले.
या सर्व गोष्टींमुळे 2-3 वर्ष टेरेस गार्डन कडे मात्र तिचे पूर्ण दुर्लक्ष झाले. झाडं बऱ्यापैकी कोमेजून गेली होती. पण ती ने परत कंबर कसली.. नवीन कुंड्या, खते, रोपे.. ती कामाला लागली.. मालकाच्या स्पर्शाने पुन्हा झाडे खुलली त्यांच्यावर फुले लगडली पण तरीही तिला एक खंत सतावीत होती.. अजून पक्षी बागेत आले नव्हते..
आणि एक दिवस दुपारी ती आराम खुर्चीत बसून चहा पीत असताना तिला परिचित चिव चिव ऐकू आली.. एक दोन करत 7-8 चिमण्या बागेत अवतरल्या आणि बागडू लागल्या.. आणि ती धीट चिमणी तिच्या जवळ आली व तिच्याकडे मान वेळावून बघत चिव चिव करत राहिली जणू चिमणी ती ला थँक्यू म्हणत होती..
आणि आज तिच्या मनाची बागही पुन्हा फुलून गेली.

©आशुतोष 

टिप्पण्या